Divya Shinde: दिव्या शिंदेंवर जोरदार टीका; ‘लोक भावनिक असतात कोणालाही डोक्यावर घेतात’

बिग बॉस मराठी ६ मध्ये दिव्या शिंदे यांची एन्ट्री झाल्यानंतर त्यांच्याभोवती उत्सुकता, अपेक्षा आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसत आहे. शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीपासूनच समाजकारण, आंदोलन आणि संघर्षाशी जोडल्या गेलेल्या दिव्या शिंदेंकडे अनेक प्रेक्षक ‘प्रतिनिधी आवाज’ म्हणून पाहत आहेत. मात्र, त्यांच्या बिग बॉस सहभागावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

फेसबुकवरील एका पब्लिक पोस्टमधून दिव्या शिंदेंच्या भूमिकेबाबत स्पष्ट आणि थेट मत व्यक्त करण्यात आलं आहे. पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की दिव्या शिंदेंची बिग बॉस मराठीत निवड होणं चुकीचं नाही, परंतु त्यांनी या मंचाचा वापर केवळ मनोरंजनापुरता न करता सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी करावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांच्या निवडीचा अर्थच हरवेल, असा सूचक इशाराही पोस्टमधून देण्यात आला आहे.

त्याच पोस्टमध्ये पुढे नमूद करण्यात आलं आहे की, दिव्याने शोच्या सुरुवातीला निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला, हे योग्य असलं तरी ते केवळ प्रतीकात्मक न राहता तिच्या भूमिकेत सातत्य दिसावं. “लोक भावनिक असतात, कोणालाही डोक्यावर घेतात,” असं नमूद करत, समाजाने केवळ भाषणांपेक्षा कृती करणाऱ्या व्यक्तींनाच पाठिंबा द्यावा, असं मतही व्यक्त करण्यात आलं आहे.

पोस्टमध्ये आणखी असं सांगण्यात आलं आहे की बिग बॉस अनेक स्पर्धकांसाठी मनोरंजनाचा मंच असू शकतो, मात्र दिव्या शिंदेंसाठी तो संघर्ष मांडण्याची भूमी असावी. सामाजिक प्रश्न, अन्याय आणि आंदोलनांबाबत जर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर प्रेक्षकांची निराशा होऊ शकते, अशी भावना या पोस्टमधून व्यक्त केली गेली आहे.

दरम्यान, या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून काही जणांनी या अपेक्षांना पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी दिव्याला तिचा गेम स्वतःच्या पद्धतीने खेळू द्यावा, असं मत मांडलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात दिव्या शिंदे कोणती भूमिका घेते आणि ती या अपेक्षांवर खरी उतरते का, हे पाहणं आगामी भागांमध्ये अधिकच उत्सुकतेचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या